मुंबई – बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश असणार आहे.