पुणे – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून सुट्टी असून, ही 12 जूनपर्यंत असणार आहे. शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. या प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत सुट्टीच्या तारखांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागकडे पाठविला आहे. उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करून या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या वेळेस देता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत. मात्र, या सुट्टया देताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले.
एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग
करोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करून एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानंतर शिक्षणविभागाने हा निर्णय घेतला आहे.