पुणे – शाळा महाविद्यालयांसह कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांना आणि दुचाकीवरून जाणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. चार वर्षावरील नागरिकांसाठी हा नियम लागू होत असल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गुरूवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहन चालवताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुचाकीच्या अपघातांमध्ये होणाऱ्या जीवितहानीमध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हेल्मेट वापरासंबंधी प्रबोधनात्मक आणि अंमलबजावणी संदर्भात व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे, या कडे या आदेशात लक्ष वेधले आहे.
…तर होणार कडक कारवाई – परिवहन आयुक्तांचेही आदेश
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेटचा वापर करण्यासंबंधी प्रबोधन करावे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, शैक्षणिक आणि इतर संस्थांनाही सहभागी करून घ्यावे. त्यानंतर शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर मोटरवाहन विभाग आणि स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत कडक कारवाई करावी आणि त्या कारवाईचा अहवाल कार्यालयाला सादर करावा, असे आदेश परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना लेखी दिले आहेत.