किव्ह – रशियाच्या फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हजवळ जोरदार हल्ले सुरू केले असून राजधानीजवळ आता जोरदार धुमश्चक्रीला सुरूवात झाली आहे. सैन्याची जमवाजमव करण्यासाठी अवधी मिळावा म्हणूनच रशियाने गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा आभास निर्माण केला होता, असे आता निष्पन्न झाले आहे.
रशियाच्या फौजांकडून आता डोनबासवर नव्याने हल्ले करण्याची तयारी केली आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी पहाटेच्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
दरम्यान रशियाच्या फौजांनी अंशतः शस्त्रसंधीला मान्यता दिल्यानंतर मारिऊपूल शहरातील नागरिकांना सोडवण्यासाठी बसचा एक ताफा शहराच्या दिशेने रवाना झाला आहे. आता रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने चर्चेची पुढची फेरी शुक्रवारी होणार आहे.
युक्रेनच्या फौजांनी पुन्हा ताब्यात घेतलेली किव्हच्या उपनगरांवर रशियाने पुन्ह हल्ले सुरू केले आहेत. रशियाने दोनच दिवसांपूर्वी उत्तरेकडील चेर्निहिव्ह शहराजवळून सैन्य मागे घेण्याचे सूतोवाच केले होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. चर्निहिव्ह शहरावर रशियाकडून जोरदार हल्ले सुरू असल्याच्या वृत्ताला ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाकडूनही दुजोरा मिळाला आहे.
कारकीव्ह शहरावरही रशियाने हल्ले वाढवले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. इरपिन आणि मकार्सिव्ह या उपनगरांवर रशियाच्या फौजांनी तोफगोल्यांचा मारा सुरू केला आहे. या माऱ्याला युक्रेनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे काही भागांमधून रशियाच्या सैन्याला माघार घ्यावी लागली आहे, असे गव्हर्नर ओलेक्सांदर पालवियुक यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
चौकट
रेड क्रॉसची टीम मारिऊपूलला रवाना…
अन्न, पाणी आणि औषधांसह अन्य अत्यावश्यक साहित्य घेऊन रेडक्रॉसची टीम मारिऊपूलला रवाना झाली आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आता 45 बसचा ताफा मारिऊपूलला रवाना झाला आहे. सुटकेसाठी खुल्या करण्यात आलेल्या कॉरिडॉरच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाख नागरिकांना मारिऊपूलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मात्र त्यानंतर रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे तसे प्रयत्न अयशस्वी झाले होते.