नवी दिल्ली : केरळमधील थ्रिसूरमधील मणप्पुरम फायनान्स लिमिटेड समूहाच्या ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रमोटर व्हीपी नंदकुमार यांचे मुख्यालय आणि निवासस्थानावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीशिवाय ग्राहकांकडून 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी बेकायदेशीरपणे गोळा केल्याचा आरोप ईडीकडून लावण्यात आला आहे. त्यानुसार हे छापे टाकण्यात आले असल्याचे म्हटले गेले आहे. केवायसी नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असल्याचाही संशय आहे. मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स बुधवारच्या व्यापारात 4 टक्क्यांनी घसरले कारण अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळमधील त्रिशूरमधील मणप्पुरम समूहाच्या परिसरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
स्टॉक 4.47 टक्क्यांनी घसरून बीएसईवर 123.85 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दोन आठवड्यांच्या सरासरी 2.85 लाख शेअर्सच्या तुलनेत आतापर्यंत एकूण 4.39 लाख शेअर्सचे व्यवहार झाले. ही बातमी अशा वेळी आली जेव्हा मणप्पुरम फायनान्सचे बोर्ड या महिन्याच्या शेवटी डेट सिक्युरिटीज जारी करण्याचा विचार करत होते.
कंपनीतील प्रमोटरांचा हिस्सा 35.2 टक्के आहे. गेल्या 5 तिमाहीत 35.06 च्या तुलनेत आता तो 35.2 टक्के आहे. FII म्हणजेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी केले आहेत. गेल्या 5 तिमाहीत त्यांचा हिस्सा 29.83 टक्क्यांवरून 30.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च तिमाहीत हिस्सा 30.07 टक्क्यांवरून 30.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.