मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाय.बी.सेंटर येथे “लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. सभागृहात उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना तर अक्षरशः अश्रु अनावर झाले. या संपूर्ण घटनेत पवार कुटुंबातील अजित पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली. मात्र, कायम सोशल मीडियावर सक्रीय असणारे रोहित पवार यांनी अद्यापही मौन बाळगल्याचे दिसते.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील याबाबत कुठल्या प्रकारची पोस्ट केलेली नाही, यावर त्यांनी माध्यमांनाही आपलं मत सांगितलेलं नाही. गेल्या २४ तासात रोहित पवार गप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. अद्याप त्यांनी ना मीडियासमोर यासंदर्भात भाष्य केले, ना या घडामोडींवर एखादं ट्विट केलं. त्यामुळे, रोहित पवार गप्प का आहेत, त्यांची या घटनांवर काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीसह त्यांचे इतरही फॉलोवर्स प्रश्नांकित आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चांवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मंत्री ,नेते मंडळी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या चर्चांवरही रोहित पवार यांनी आपले मत मांडले नाही. कायम सोशल मीडियावर सक्रीय असणारे रोहित पवार यांनी अद्यापही मौन बाळगल्याचे दिसते.