पिंपरी – चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 22) वाकडमध्ये रोड शो केला. “रोड’शो दरम्यान नागरिकांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात वागत केले. या रोड शोमुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेषतः तरुणाईची तुफान गर्दी उसळली होती. भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले हे शक्तिप्रदर्शन पोटनिवडणुकीत लक्षवेधी ठरले.
मुख्यमंत्र्यांसोबत “रोड शो’मध्ये भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षाचे अनेक नेते सामील झाले होते. उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार भरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची बरसात करत त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरूवात केली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढे विमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाइल कॅमेऱ्याने टिपताना लोक दिसत होते. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमुळे महायुतीच्या वतीने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.