सातारा -“”छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांनाच कायम आदर असून छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षात असल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. उदयनराजे यांचा पक्षाने नेहमीच सन्मान केला असून भविष्यात त्यांना मोठी संधी देऊन त्यांचा उचित सन्मान होईल,” असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
अजयकुमार मिश्रा दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी जलमंदिर पॅलेस निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन श्री भवानीमाता देवीचे दर्शन घेतले.
यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, रंजना रावत, गीतांजली कदम व मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री. मिश्रा म्हणाले, “”छत्रपतींच्या गादीचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे. छत्रपतींच्या घरात जन्मलेला उदयनराजेंना कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र छटणारे राजे म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. राजघराण्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटल्याचा आपल्याला मनस्वी आनंद झाला आहे.” उदयनराजेंना पक्षाच्यावतीने भविष्यात नक्की मोठी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.