पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का?; कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला झाले रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली :  पंजाबमधील राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे मोठी समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

१८ सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस हायकमांडविषयी नाराजी देखील बोलून दाखवली होती. “दोन महिन्यात तीन वेळा राज्यातील आमदारांना हायकमांडनं दिल्लीला बोलावलं. जणूकाही माझ्या नेतृत्वावर त्यांना संशय आहे. मला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे. आता त्यांना ज्यांच्यावर विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील”, असं अमरिंदर सिंग म्हणाले होते. त्यामुळ काँग्रेस पक्षनेतृत्वावर त्या्ंनी आपली नाराजी उघड केली होती. त्याचवेळी “पुढील सर्व पर्याय माझ्यासाठी खुले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याविषयी निर्णय घेईन”, असे संकेत देखील त्यांनी दिले होते.

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर टीका करण्याचं धोरण अवलंबलं आहे. विशेषत: नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. “नवज्योतसिंग हा देशासाठी एक आपत्ती ठरणार आहे. त्यामुळे २०२२मध्ये मी त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करीन. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला माझा कायम विरोध असेल”, असं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकीकडे काँग्रेसला कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारखा मोहरा गमावल्यामुळे फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटते आहे. मात्र, त्याचवेळी जर अमरिंदरसिंग भाजपामध्ये गेले, तर काँग्रेसला पंजाबचा पेपर कठीणच जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचं आंदोलन आणि त्यांची भाजपाविरोधी, मोदीविरोधी भूमिका पाहाता कॅप्टन अमरिंदरसिंग भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतात का? हा चर्चेचा विषय ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.