मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्यांवर टीका करताना केलेल्या वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगलाच गदारोळ माजला होता. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
दरम्यान जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी आता न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून कार्यकर्ते असणाऱ्या विवेक चंपानेरकर यांनी अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला.’
हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असं नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.’