मुंबई : केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एक व्यक्तीने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेतील एका संशयिताला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पोलिसांना एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील एका संशयिताला पोलिसांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैफी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने कारवाई करत कोझिकोड रेल्वे आगीच्या घटनेतील फरार संशयित आरोपीला रत्नागिरीतुन अटक केली. केरळ पोलिसांचं एक पथकही रत्नागिरीत पोहोचलं असून, आरोपीला लवकरच त्यांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे.
शाहरुख सैफीचे लोकेशन काल रत्नागिरीत ट्रेस करण्यात आले. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तो रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. केरळमध्ये ट्रेनमधून खाली उतरताना पडल्यामुळे त्याला ही दुखापत झाली आहे. मात्र, उपचार पूर्ण न करताच त्याने रुग्णालयातून पळ काढला होता. यानंतर पोलिसांनी रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून शाहरुख सैफीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलंय. तो सध्या रत्नागिरी येथील रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कोठडीत असून त्याची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही.