नवी दिल्ली – शारजामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅक टू बॅक शतके फटकावली होती, त्यात सचिनने शेन वॉर्नच्या गोलंदाजीची पिसे काढली होती. सचिन माझ्या गोलंदाजीची शकले करत आहे, अशी स्वप्ने मला पडतात, असे वॉर्नने ही मालिका झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्याचीच री ओढत जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार मला बाद करत आहेत, अशी स्वप्ने पडत असल्याचे त्यांचा कर्णधार ऍरन फिंच याने म्हटले आहे.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बुमराह व स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमार मला बाद करत आहेत, असे स्वप्न मला गेले काही दिवस पडत आहे, असे फिंचने सांगितले आहे, त्याचबरोबर 2018 सालच्या मालिकेत या दोन्ही गोलंदाजांनी अत्यंत भेदक गोलंदाजी केली होती, प्रत्येक सामन्यात त्यांनी माझ्यावर अंकुश ठेवला होता, त्याचीच मला आजही धास्ती वाटते असेही व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा आढावा नुकताच अमेझॉनवर प्रक्षेपित झाला होता. त्यात फिंचने हा खुलासा केला आहे. 2018 च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फिंचसह सर्व बलाढ्य फलंदाजांना बुमराह व भुवनेश्वरची गोलंदाजी कशी खेळायची हेच समजत नव्हते. त्याचे अचूक यॉर्कर आणि भुवनेश्वरचे स्विंग चेंडू यांच्यासमोर आमच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.