मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात आजच्याच दिवशी (16 मार्च 2012) एक शतकी खेळी केली होती. तशी सचिनने कारकिर्दीत अनेक शतके केली. मात्र, या शतकाचे मोल निराळेच आहे. कारण हे शतक सचिनच्या शतकांचे शतक ठरले होते. याच दिवसाला आज 8 वर्षे पूर्ण झाल्याने पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा सचिन जागतिक क्रिकेटमधील पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
बांगलादेशविरुद्ध त्यांच्याच देशात सचिनने 147 चेंडूत 114 धावांची खेळी केली व हा स्वप्नवत विक्रम साकार केला. सचिनला हा पल्ला गाठण्यासाठी केवळ एका शतकाची गरज होती, मात्र त्यासाठी त्याला 99 ते 100 शतकांची नोंद करण्यासाठी जवळपास 1 वर्ष वाट पाहावी लागली. 2011 सालच्या मार्च महिन्यातच सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 99 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद केली होती. सचिनचे बांगलादेशविरुद्धचे हे पहिलेच शतक ठरले तर कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध शतक करणारा पहिलाच फलंदाज देखील सचिन बनला.
सचिनने कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34 हजार 347 धावा नोंदविल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 18 हजार 426 तर, कसोटी सामन्यात 15 हजार 921 धावा सचिनच्या नावावर आहेत. सचिनने कसोटीत 51 तर, एकदिवसीय सामन्यांत 49 शतके फटकावली आहेत. सचिनच्या याच कामगिरीला त्याच्या चाहत्यांनी उजाळा दिला आहे तर सोशल मीडियावरही सचिनच्या अभिनंदनाच्या पोस्ट करत त्याच्या कामगिरीला सलाम केला आहे.