नादुरुस्त पीएमपीमुळे भोसरी-आळंदी रस्ता “जाम’

पिंपरी – भर दुपारच्या वेळी पीएमपी बस भोसरी-आळंदी रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडली. त्यामुळे या रस्त्यावर सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या उकाड्याने जीव कासावीस होत असतानाच, वाहतूक कोंडीत अडकलेले प्रवासी व अन्या वाहनचालक घामाच्या धारांनी हैराण झाले. ही नादुरुस्त बस सुरु करुन मार्गस्थ झाल्यानंतर ही वाहतूक कोंडी सुटली.

भोसरी-आळंदी रस्ता तुलनेत अरुंद आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळी सकाळ-संध्याकाळी या रस्त्यावर कायम वाहनांची मोठी वर्दळ सुरु असते. याच रस्त्यालगत एक खासगी भाजी मंडई असल्याने सायंकाळी या रस्त्यावरून पायी चालणेदेखील मुश्‍किल होते. दुपारीदेखील या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर दुभाजक उभारलेले नाहीत. तसेच रस्त्यावरील सम, विषम पार्किंगच्या पाट्या केवळ नावापुरत्याच उभ्या केल्या आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने लावली जात असल्याने या कोंडीत आणखी भर पडते.

या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. मात्र, हा रस्ता रहदारीसाठी अपुरा पडत आहे. सायंकाळी या रस्त्याच्याकडेलाच पथारी व्यवसायिक बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातच या वर्दळीच्या रस्त्यावर पीएमपीचे दोन बस थांबे असल्याने, प्रवाशांच्या अगदी काही सेकंदांसाठी होणाऱ्या चढ-उतारामुळेदेखील वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.