मुंबईतील बैठकीत निर्णय ः कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर, करणार प्रचार
पिंपरी – लोकसभा निवडणुकीत रिपाइंच्या आठवले गटाला सेना-भाजप युतीने एकही जागा सोडली नाही. त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा? असा प्रश्न आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र, गुरुवारी मुंबईत झालेल्या रिपाइं आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत “झाले गेले विसरून जा’ असे सांगत, आपल्याला शिवसेना -भाजप उमेदवारांचा प्रचार करायचा आहे, अशा सूचना केंद्रीय सामाजिक व न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आजपासून आता आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोकसभा जागा वाटपानुसार या दोन्ही पक्षांचा झेंडा हाती घेणार आहेत. मुंबईतील सांताक्रुज येथे पक्षाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
केंद्रात दलित चेहरा असावा, याकरिता आठवले यांना राज्यसभा सदस्यपदाची संधी देत, केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले होते. त्यानंतर आपणही जनतेमधून निवडून जावे, याकरिता शिवसेना-भाजप युतीमधील जागा वाटपात दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ मला सोडावा, अशी मागणी आठवले यांनी केली होती. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा संधी दिल्याने आठवले काहीसे नाराज झाले होते.
दरम्यान, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र, सर्व रिपाइं गटांपैकी ताकदवान समजल्या जाणाऱ्या आठवले गटात मात्र या निवडणुकीबाबत कमालीचा अनुत्साह दिसून येत होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीत नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा ? असा प्रश्न रिपाइं कार्यकर्त्यांना पडला होता.
दरम्यान, आठवले यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील सांताक्रुज येथे पक्षाची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, माजी आमदार अनिल गोंडानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहाद्दुरे, कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे आदी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी आपली भूमिका मांडली. त्यावर झाले गेले विसरून जा. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्यायची आहे. त्यामुळे सेना-भाजप युतीच्या उमेदवारांचा प्रचारात सक्रीय सहभागी होण्याच्या सूचना आठवले यांनी दिल्या आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यस्तरीय बैठकीत सेना-भाजप उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्यापही आमच्याशी युतीमधील कोणत्याही एका पक्षाने संपर्क साधलेला नाही. प्रचारात सहभागाचे आमंत्रण आणि सन्मानाची वागणूक मिळाल्यास शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवू.
– सुधाकर वारभुवन, शहराध्यक्ष, रिपाइं, आठवले गट