मावळ लोकसभा ः दिव्यांगांच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज
पिंपरी – दिव्यांगांचा मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवण्यास प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. दोन महिन्यांपासून राबवलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात मावळ लोकसभा मतदारसंघात 4 हजार दिव्यांग नवमतदारांची नोंद झाली आहे.
दिव्यांग मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अपंग मतदारामध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावा, त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आले होते. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 4 हजार दिव्यांग नवमतदारांनी दोन महिन्यात नोंदणी केली आहे. दिव्यांग मतदारही मतदानासाठी सज्ज झाला आहे. मावळ लोकसभा मतदारासंघामध्ये या निवडणुकीत पनवेल विधासभा मतदारसंघामध्ये 719, कर्जतमध्ये 758, उरणमध्ये 861, मावळ 579, चिंचवड 379 व पिंपरी विधानसभामतदारसंघात 494 अपंग नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.
दिव्यांगाना मतदानासाठी प्रोत्साहन
मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशन व प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या सहकार्याने 205 चिंचवड व 206 पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील दिव्यांगासाठी व्हीव्हीपॅट मशीन व मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार रोजी स. 11 वा. डॉ. हेडगेवार भवन, प्राधिकरण, निगडी येथे करण्यात आले होते.
पिंपरी विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल, मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, तहसीलदार पिंपरी, दीपक वजाळे, तहसीलदार चिंचवड राधिका बारटक्के, दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी ऐवले, नायब तहसिलदार पिंपरी विधानसभा संजय कुलकर्णी, पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशनचे परशुराम बसवा, प्रहार अंपग क्रांती संघटनेचे दत्ता भोसले, वाघचौरे, गणेश टिळेकर, चिंचवड विधानसभेचे दिव्यांग समन्वयक भाऊसाहेब कांबळे. पिंपरी विधानसभेचे दिव्यांग समन्वयक सदानंद माडे त्याचबरोबर मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी पीडब्लूडी ऍपचा वापर करुन त्या सुविधांचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन केले.