भोर -तालुक्यातील करोनाची साखळी तुटता तुटत नसून ग्रामीण भाग आणि भोर शहरातील करोनाबाधित रुग्णांनी अर्धशतक पूर्ण केले आहे. तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 52 झाला असल्याची माहिती भोर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.
भोर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 6 जुलै रोजी 43 होता. यात ग्रामीणचे 37 तर शहरी भागातील 6 रुग्णांचा समावेश होता. तर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 24 होती. उपचारानंतर घरी परतलेले 17 रुग्ण आहेत. आज (बुधवारी) यात पुन्हा वाढ झाली. तपासणीसाठी पुणे येथे पाठवलेल्या 17 जणांपैकी 10 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले.
यात पिसावरे 1, साळवडे 4, शिंदेवाडी 2, खानापूर 1, भोर शहर 1, कारी 1 अशा 10 रुग्णांचा यात समावेश आहे. तर कापूरहोळ येथील 1, राजघर येथील 1, पसुरे येथील 1 अशा तीन रुग्णांची पुणे महानगर पालिका हद्दीत नोंद झाली. सध्या तालुक्यातील 27 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
भोर शहरात 5 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण भोर शहरातील रस्ते सील केले असून शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. दि. 6 रोजी भोर शहरातील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला करोनाची बाधा झाली. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या 5-6 दिवसांत झालेल्या मिटिंगला हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मिटिंगला हजर राहिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे.