मंचर – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे अधिक श्रावणात महिन्याच्या पहिल्या सोमवारी पहाटे चार वाजता भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. “हर हर महादेव’च्या जयघोषत शनिवार, रविवार, सोमवार सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
या वर्षी अधिक श्रावण असल्याने पहिल्याच दिवसापासून येथे दर्शनाला गर्दी होत आहे. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे आणि सोमवारी भाविक मोठ्या संख्येने आले होते. दर्शन बारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांना देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली होती. भीमाशंकरपासून अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर टेम्पो, मिनी बस आणि मोठ्या वाहनांसाठी 5 नंबर वाहनतळावर व्यवस्था करण्यात आली, तर चारचाकी छोट्या गाड्यांसाठी वाहनतळ क्रमांक 3 व 4 येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहनतळ क्रमांक 1 व 2 मध्ये मोटर सायकलची व्यवस्था केलेली आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक श्रावण यात्रेनिमित्त घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, किशोर वागज, निखिल मगदुम 30 महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, 15 होमगार्ड, तर वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत भाविकांना जा-ये करण्यासाठी एसटीमहामंडळाच्या 15 मिनीबस, एसटी बस 10, अशा एकंदरीत 37 बसची व्यवस्था केली होती.
पायरी मार्गावरील छत गळके
मंदिर गाभारा व परिसरात बॅरिकटिंग, ताडपत्री असल्याने मंदिर ते पायरी मार्गात भर पाऊसात आणि दाट धुक्यात भाविक दर्शन रांगेत उभे होते; पण पायरी मार्गावरील छत पावसामुळे गळत असल्याने अनेक भाविकांना भिजत जाऊनच दर्शन घेण्याची वेळ आली. यावेळी हे गळके पडून दुर्घटना होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.