भंडारा :- “तुम्ही तुमचा व्हॉट्सप डीपी बदला, आपल्या दोघांचा फोटो काढून तुमचा एकट्याचा फोटो ठेवा,’ असे सायंकाळी फोन करून नवऱ्याला सांगून योग शिक्षिकेने धावत्या मालगाडीसमोर आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली.
फोन ठेवल्यानंतर योग शिक्षिकेने भंडारा रोड रेल्वेस्थानक गाठले. ती रेल्वे रुळावरून चालत असतानाच समोरून मालगाडी धडधडत आली अन् धावत्या मालगाडीसमोर बसून योग शिक्षिकेने आपले जीवन संपविले. ही घटना काल 12 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. मृत विवाहितेचे नाव कलावती मलेवार (40, रा. मोहगाव देवी) असे असून ती योग शिक्षका आणि एलआयसी एजंट होती.
सायंकाळी तिने तिच्या दुचाकीने भंडारा रोड (वरठी) रेल्वे स्थानक गाठले. स्थानकापासून एक कि.मी. अंतरावर तिने तिची दुचाकी ठेवली आणि दुचाकीची चाबी स्वतःच्या बुटात ठेवली. त्यानंतर ती एक किमी चालत रेल्वे रुळावर आली. ती रुळावरून चालू लागली. तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पुलावरून जाणाऱ्या एका तरुणाला दिसले. त्याचवेळी खातकडून कोक्याच्या दिशेने एक मालगाडी येत असल्याचे पाहून कलावती रुळावर बसली.
धावत्या मालगाडी खाली स्वतःला झोकून देत तिने आत्महत्या केली. या अपघातात तिचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता आणि तिचा उजवा हात कोपरापासून वेगळा झाला होता. रुळावर तिचे मंगळसूत्र पडलेले दिसल्याने ती विवाहित असल्याची खात्री पटली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने वरठी येथे तिचे स्वतःचे योग शिकवणी वर्ग सुरू केले होते. नियमितपणे ती मोहगाववरून वरठीला योगा शिकविण्याकरिता यायची. मात्र मागील दीड महिन्यापासून ती काहीशी तुटक वागत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
काल सायंकाळी कलावतीने नवऱ्याला फोन करून व्हॉट्सप डीपी बदलवून तुमचा एकट्याचा ठेवा असे सांगितले. मात्र नवऱ्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. त्याने मुलाला आई असे का बोलली असेल? असेही विचारले. मात्र कलावतीच्या मनात काय चालले होते कुणालाही कळले नाही.