मनमाड – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकानयनात लक्षवेधी कामगिरी करणारा महाराष्ट्राचा रोइंगपटू दत्तू भोकनळ याने सेनादलाचा राजीनामा दिला आहे. आपल्यामध्ये ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता आहे मात्र, केवळ महाराष्ट्रीयन असल्यामुळेच माझ्यावर अन्याय झाला. मला टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या स्पर्धांमध्येही खेळू दिले नाही, अशा शब्दात दत्तूने रोइंग महासंघावर तोफ डागली आहे.
महाराष्ट्रीयन असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता असूनही अचानक मला शिबिरातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मला ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा आरोप दत्तू भोकनळने केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकाराची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दत्तू भोकनळ याने केली आहे.
दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता. दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या गावचा रहिवाशी आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात 2014 साली राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली.
2015 साली चीनला झालेल्या आशियाई नौकानयन स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रजतपदक पटकावले होते. 2017 साली त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले होते. तर 2020 साली त्याचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. दत्तू भोकनळने आशियाई स्पर्धेत सहभागी होताना भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.