Beed Lok Sabha Election 2024 : भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन वेळा येथून खासदार राहिलेल्या प्रितम मुंडे यांना डावलून भाजपने ही उमेदवारी पंकजा यांना जाहीर केली. मात्र पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. त्याचे कारण म्हणजे शरद पवार यांची राजकीय खेळी.
चर्चांवर विश्वास ठेवला तर शरद पवार यांनी बीड मतदारसंघासाठी मोठी रणनिती आखली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरु आहे.
बीड लोकसभेसाठी शरद पवार यांनी एक बैठकही आयोजित केली होती. शरद पवार गटाकडून येथून उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयसिंग गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, ईश्वर मुंडे आदी नेते तयारी करत आहेत. त्यांचे भेटीगाठींचेही सत्र सुरू आहे. मात्र पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा व पक्षाची ताकद त्याच्यामागे उभी करायची, असे गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडले जात आहे.
डॉ. ज्योती मेटे यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. त्यामुळे मेटे यांना बीडची उमेदवारी दिली तर अनेक बदल याठिकाणी होण्याची शक्यता आहे. तसेच हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठा राजकीय डाव असल्याचे बोलले जात आहे.
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला होता. मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला आहे. यातच मराठा समाजाचाही रोष सध्या राज्य सरकारवर आहे आणि याचाच फायदा शरद पवार घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजल्याने शरद पवार ज्योती मेटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन मराठा समाजाचे मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शरद पवार करण्याची शक्यता आहे. ज्योती मेटे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देऊन संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मत आपल्याकडे वळवण्याचा शरद पवारांचा डाव असल्याचीही चर्चा सुरू आहे.
अपघातात झाले होते विनायक मेटे यांचे निधन
दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण १५० मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने दोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांत पाच टप्प्यांत होणार मतदान
आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ४८ मतदार संघांमध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. कोणत्या टप्प्यात कोणत्या मतदार संघात मतदान होणार आहे याची माहिती पुढील प्रमाणे.
पहिला टप्पा – १९ एप्रिल – गडचिरोली, भंडारा-गोंदीया, नागपुर, चंद्रपुर, रामटेक
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापुर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणंगले.
चौथा टप्पा – १३ मे – अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर.
पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सर्व सहा मतदार संघ.
देशातील सात टप्प्यांमध्ये किती मतदार संघात कसे मतदान
पहिला टप्पा – १९ एप्रिल – एकूण १०२ मतदार संघात मतदान
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – एकूण ८९ मतदार संघात मतदान
तिसरा टप्पा – ७ मे – एकूण ९४ मतदार संघात मतदान
चौथा टप्पा – १३ मे – एकूण ९६ मतदार संघात मतदान
पाचवा टप्पा – २० मे – एकूण ४९ मतदार संघात मतदान
सहावा टप्पा – २५ मे – एकूण ५७ मतदार संघात मतदान
सातवा टप्पा – १ जून – एकूण ५७ मतदार संघात मतदान
मतमोजणी – ४ जून २०२४