Lok Sabha Election 2024 । Election Commission : देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी केली.
या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. लोकसभेबरोबरच चार राज्यांत विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. आजच्या घोषणेबरोबरच देशभर निवडणूक आचारसंहिताही लागू झाली आहे. ( Election Commission )
आज जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुका १९ एप्रिल रोजी होतील, त्यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च अशी आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका २६ एप्रिल रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका ७ मे रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुका १३ मे रोजी होतील, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल अशी आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणुका २० मे रोजी होतील, उमेदवारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख ३ मे रोजी अशी आहे. सहाव्या टप्प्यातील निवडणुका २५ मे रोजी होतील, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख मे ६ अशी आहे. सातव्या टप्प्यातील निवडणुका १ जून रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांच्या नामांकनाची अंतिम तारीख १४ मे अशी आहे.
आगामी निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. दारू आणि साड्या वाटप करण्याच्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ( Election Commission )
तसेच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हिंसामुक्त निवडणुका राबवणं ही आमची जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, मतदानाबाबतची कोणतीही माहिती वेबसाईटवर मिळेल असं देखील मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यांनी सांगितलं आहे.