पुणे विद्यापीठामार्फत परीक्षेचा निकाल जाहीर होणार
पुणे – पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून अन्य विद्यार्थ्यांना मिळणारी ग्रेड ही 50 टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आणि 50 टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेण गुण या गणितीय सूत्राचा वापर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या सूत्राचा तपशीलही प्रसिद्ध केला आहे.
करोना आणि टाळेबंदीमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन व परीक्षांकरिता एक सामाईक योजना तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली होती. समितीच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये विचारमिनियम करण्यात आला आहे.
त्यानंतर शासनाच्या समितीच्या शिफारसीस अनुसरून सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची सुरक्षा व आरोग्य याचे गांभीर्य लक्षात घेता गणितीय सूत्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निश्चित केले. अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळता अन्य विद्यार्थ्यांना मिळणारी ग्रेड 50 टक्के अंतर्गत मूल्यामापन व 50 टक्के पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण असे सूत्र ठरविण्यात आले. यास विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या प्रथम ते अंतिमपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
त्याचप्रमाणे महाविद्यालय स्तरावरील परीक्षा तसेच स्वायत्त व संलग्न महाविद्यालयाच्या परीक्षांच्या निकालासाठी अधिकार मंडळाने मान्यता दिलेल्या गणितीय सूत्रांचा वापर करण्यात यावा. विद्यापीठाने तयार केलेले गणितीय सूत्राचा तपशील प्रसिद्ध करण्यात आल्याने महेश काकडे यांनी स्पष्ट केले.