62% बाधित प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरचे
पुणे – ज्या भागात 3 पेक्षा अधिक करोनाबाधित सापडतात, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून महापालिका घोषित करते. मात्र, मागील पंधरा दिवसांत शहरात तब्बल 62.2 टक्के करोना बाधित हे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सापडले आहेत. त्यामुळे हे क्षेत्र नावालाच उरली आहेत. तर, येथील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर नागरिकांना कामावर जाण्यास तसेच घराबाहेर पडण्यास मनाई आहे. पण, हे नागरिक राजरोसपणे शहरभर फिरत असल्याने ही करोना बाधितांची संख्या वाढत आहे.
महापालिकेने शहरात 3 मेपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरूवात केली. त्यासाठी केंद्राच्या आदेशानुसार शहरात सर्वाधिक करोना रुग्ण असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे या क्षेत्रातून शहराच्या इतर भागात करोनाचा प्रसार होणार नाही, तसेच या भागातील रुग्णांची संख्याही कमी होईल, असा उद्देश होता. त्यानुसार पालिकेने 3 मे ते 17 जूनपर्यंत चार वेळा प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली. मात्र, करोना पसरत असल्याचे चित्र आहे.