कोयनानगर -लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्यांनी कटाक्षाने व काळजीपूर्वक कामकाज करावे, अशी सूचना पाटण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली.
पाटण विधानसभा मतदारसंघातील 848 मतदान कर्मचार्यांचे प्रशिक्षण आडुळ येथील एका मंगल कार्यालयात दोन सत्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षणात तालुक्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले होते.
या कर्मचार्यांची मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. यावेळी पहिल्या सत्रात तहसीलदारांनी कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले. कर्मचार्यांच्या शंकांचे निराकरण सुनील गाढे यांनी केले. दुसर्या सत्रात आडुळ शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी 40 ते 50 च्या गटांमध्ये मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पाटणमधील महिला कर्मचारी वगळता, इतर मतदान कर्मचार्यांची नियुक्ती अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या आणि नियमानुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदान कर्मचार्यांनी निवडणूक कामकाज करताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना अल्पोपहार देण्यात आला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशिक्षणानंतर मतदान कर्मचार्यांची परीक्षा घेण्यात आली. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, निवडणूक नायब तहसीलदार पंडित पाटील, प्रनायब तहसीलदार (महसूल) विलास गभाले, क्षेत्रीय अधिकारी, मंडलाधिकारी व तलाठ्यांनी परिश्रम घेतले.