पाचगणी – खासदार उदयनराजे यांनी पाचगणी शहरात संवाद यात्रेदरम्यान हॅाटेल नमस्ते पुरोहितमध्ये भाजपचे विविध पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत हितगुज केले.
देशात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात विविध प्रमुख पक्षांनी सावध भूमिका घेत आपापले उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. मात्र, राज्यसभेतील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार असे सांगत जिल्ह्यात संवाद यात्रेद्वारे विविध तालुक्यांत भाजपच्या पदाधिकाऱयांच्या गाठीभेटी घेत महायुतीतील मित्रपक्षांबरोबर हितगुज करण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे.
पाचगणीत उदयनराजे यांनी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांंशी संवाद साधत हितगुज केले. यावेळी पाचगणी शहरातील आणखी दोन ठिकाणी उदयनराजे यांनी संवाद साधला. वाई येथे लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याकरीता जाताना त्यांनी पाचगणीतील लोकांशी संवाद साधला. यावेळी पाचगणी शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच महायुतीतील घटक पंक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.