सावधान! छातीतील धडधड समजून घ्या… अन्यथा होईल असं काही कि…

 हृदयरोगाचं निदान होण्याचं वय
50 समजण्याचे दिवस
केव्हाच मागे पडले आहेत.
आजकाल तरुणपिढी मोठ्या
प्रमाणावर हृदयाशी संबंधित विकारांना
बळी पडताना दिसून येत आहे.
अलीकडेच अनेक नामांकित
तरुणांच्या हृदयविकाराच्या झटक्‍याने
झालेल्या मृत्यूमुळे कमी वयातही
हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,
हे दिसून आलं आहे. बदलत्या
जीवनशैलीसोबतच अनुवंशिकता
हे देखील हृदयविकाराचं प्रमुख
कारण असल्याचं आढळतं.
याविषयी अधिक जाणून घेऊ..

डॉ. चैतन्य जोशी

काही वर्षांपूर्वी हृदयविकार माणसाला वयाच्या पन्नाशीनंतर गाठत असे, पण अलीकडे घडलेल्या काही घटनांमधून हा विकार होण्याची वयोमर्यादा आश्‍चर्यकारकरीत्या कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
गेल्या वर्षभरातच अभिनेता करण परांजपे, अबीर गोस्वामी, इंदर कुमार हे हार्ट ऍटॅकने मृत्यू पावलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं. या अभिनेत्यांचा मृत्यू सर्वानाच चटका लावून गेला. यापैकी करणचं वय अवघं 23 होतं. या वयात व्यक्तीची शारीरिक क्षमता सर्वात जास्त प्रमाणात कार्यरत असते. काही तरी करून दाखवण्याच्या वयात हार्ट ऍटॅकने गाठल्यावर सर्वच बाबींना मर्यादा पडतात. त्यामुळे तुम्ही निरोगी आहात की नाही हे वय नाही तर जीवनशैलीवर अवलंबून असतं.

आजकाल मधुमेह आणि हृदयविकारांना वयाची मर्यादा राहिली नाही. सोनम कपूरसारखी तरुण अभिनेत्री इतक्‍या कमी वयात मधुमेहाला बळी पडली आहे, यावरूनच हे विकार युवावर्गावर जाळं पसरत आहेत हे दिसून येतं. इतक्‍या कमी वयात हृदयविकारांना बळी पडण्याचं कारण जीवनशैलीशी बऱ्याच अंशी निगडित आहे. मागील वर्षी जुलैमध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार देशात दर तीन सेकंदाला हार्ट ऍटॅकने एक व्यक्ती मृत्यू पावते. यामध्ये 25 टक्के मृत्यू हे चाळिशीला पोहोचण्यापूर्वीच होत असतात. या आकडेवारीवरून या विकाराची तीव्रता लक्षात येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वेगाने बदलणारी जीवनशैली हे या विकाराच्या मुळाशी असलेलं कारण आहे. वेगाने बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हृदयरोगाची शक्‍यता मोठ्या प्रमाणावर बळावते.

अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍यानं निधन होणं, म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न इथे निर्माण होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या शारीरिक अवस्थेत हृदय अचानकच अनपेक्षितपणे धडधडायचं थांबतं. हे घडतं त्यावेळी मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा थांबतो. व्यक्तीला कार्डीयाक अरेस्टचा उच्च धोका आहे का हे तपासण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात. यात इलेक्‍ट्रोकार्डीओग्रामचा समावेश असतो. त्याद्वारे हृदयाच्या विद्युत स्वरूपाच्या हालचालींची नोंद केली जाते.

यामध्ये रुग्णाच्या छातीला वॉकमन आकाराचा होल्टर मॉनिटर एक ते दोन दिवसांसाठी लावून ठेवला जातो. तो हृदयाच्या लयीची सातत्यानं नोंद करतो. रेकॉर्डर काढल्यानंतर अचानक हृदय बंद पडण्याचा धोका आहे का, हे तपासण्यासाठी त्याच्या नोंदींचं विश्‍लेषण केलं जातं.

शरीराच्या अवयवांपर्यंत रक्त पाठवण्याची म्हणजेच हृदयाची पंपिग क्षमता इकोकार्डीओग्राम मोजतो आणि त्याबरोबरच अचानक हृदय बंद पडण्याची शक्‍यता वाढवणाऱ्या इतर समस्याही ओळखतो. इलेक्‍ट्रोफिजिऑलॉजी स्टडीद्वारे लयीतील समस्या आणि हृदयाच्या अनुचित विद्युत सिग्नलचे स्रोत ओळखले जातात.

कोरोनरी आर्टरीचा आजार आहे का किंवा रचनात्मक वैगुण्य आहे का, हे तपासण्यासाठी कार्डियाक कॅथेटेरायझेशनची चाचणी केली जाते. याखेरीज कार्डियाक एंझाइम, इलेक्‍ट्रोलाईट, ड्रग, हार्मोन यासारख्या काही चाचण्याही सुचवल्या जातात. हृदयविकाराचा वाढता धोका लक्षात घेता या चाचण्यांची वरवरची माहिती सर्वांना असावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे या चाचण्यांची नावं वाचून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक गोंधळून किंवा घाबरून जात नाहीत.

अनेक रुग्णालयात हृदयरुग्णांसाठी समुपदेशकाची सोय उपलब्ध करू दिली जाते. रुग्णालयातील समाजसेवक आणि इतर सहाय्यक त्या त्या वेळी हृदयविकारासंदर्भात माहिती देतात; परंतु त्यावेळी सहसा लोक घाबरून गेलेले असतात. परिणामी, आधीच अशा प्रकारची जुजबी माहिती असणं महत्त्वाचं ठरतं. उपचार आणि निदान यामध्ये वजनाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं.

कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरॉइड यांच्या पातळ्या मोजल्या जातात. रक्तदाब मोजला जातो. वजन आटोक्‍यात असणं आणि मधुमेहाच्या तसंच हृदयविकाराच्या नियमित तपासण्या करून घेणं याला या बाबतीत मोठंच महत्त्व दिलं जातं. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मते, सहसा पस्तिशीच्या आत असलेल्या लोकांची हृदयं अचानक बंद पडतात त्यावेळी त्यांच्या हृदयात आधी दोष असतात आणि त्यांची एक तर तपासणी झालेली नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी झालेलं असतं. अशा वेळी शारीरिक खेळ किंवा व्यायाम अगर जोरदार हालचाली करताना मृत्यू उद्‌भवतात. हे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येतं.

तरुण ऍक्‍टर्स आणि ऍथलिटस्‌मध्ये हृदयक्रिया अचानक बंद पडून मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं जागतिक स्तरावरच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दर वर्षी सुमारे 50 हजार ऍथलिटस्‌पैकी एकाचा तरी असा मृत्यू होतो, असं आकडेवारी सांगते. हृदयातील बिघाड हे यामागचं प्रमुख कारण असतं. हृदयरोग कधीच अचानक उद्‌भवत नाहीत. अनेकदा आनुवांशिकताही हृदयरोगाला कारणीभूत ठरत असते. यामध्ये शक्‍यतो हृदयस्नायूच्या भित्तिका जाड झालेल्या असतात. त्यामुळे हृदयाच्या विद्युत यंत्रणेत विघ्न येतं आणि हृदयाची जलद किंवा अनियमित धडधड सुरू होते. त्यामधून मृत्यू होतो.

हृदयविकारामुळे तिशीच्या आतील लोकांचा होणारा अचानक मृत्यू हा बहुतेक वेळा या कारणानं झालेला असतो. काही वेळा जन्मत:च हृदयाच्या रक्तवाहिन्या विचित्र प्रकारे एकमेकींशी जोडल्या गेलेल्या असतात. व्यायामादरम्यान त्या दाबल्या जातात. त्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. हृदयाच्या लयीत बिघाड असेल तर हृदयाचे ठोके जलदगतीने, कशाही प्रकारे पडू लागतात. यामध्ये सहसा रुग्ण बेशुद्ध पडतात. त्यांचं हृदय अचानक बंद पडण्याचा मोठा धोका असतो.

याखेरीज काही वेळा हृदयाच्या स्नायूला विषाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळे किंवा इतर आजारामुळे या स्नायूचा दाह होतो. यापैकी कोणताही आजार नसतानाही अचानकच मृत्यू घडू शकतो. छातीवर जोरदार आघात झाला तर हे होऊ शकतं. एखाद्या खेळाडूचा किंवा हॉकीच्या स्टीकचा हृदयाच्या विद्युतचक्राच्या वेळी ठरावीक वेळी छातीवर जोरदार प्रहार झाला तर तिथल्या तिथे मृत्यू घडतो.

हृदयरोगांची लक्षण प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी असू शकतात. अचानक बेशुद्ध पडणं हे काही रुग्णांमध्ये दिसून येणारं लक्षण असतं. शारीरिक हालचालींदरम्यान असं घडलं तर ते हृदयाची समस्या असल्याचं द्योतक असतं. रुग्णाच्या कुटुंबात अचानक हृदय बंद पडण्याचा इतिहास असेल तर अधिक दक्षता घ्यावी लागते. कुटुंबात पन्नाशीच्या आत अचानक मृत्यू होण्याचा इतिहास आहे का, हे तपासावं लागतं. श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत वेदना होणं हीसुद्धा हृदयक्रिया अचानक बंद पडण्या आधीची लक्षणं असू शकतात.

हृदय अचानक बंद पडलं तर उपचाराच्या दृष्टीनं वेळेला सर्वाधिक महत्त्व असतं, कारण रक्तपुरवठा बंद झाला तर मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होत नाही. त्यामुळे झटका आल्यापासून चार ते सहा मिनिटांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी उपचाराला सुरुवात होणं आवश्‍यक असतं. तसं झालं तर मेंदूला कायमस्वरूपी दुखापत होण्याचा धोका टळतो.

विद्युत शॉक देऊन हृदय पुन्हा मूळ लयीत आणण्याचे उपचार केले जातात. यासाठी जलदगतीने वैद्यकीय मदत मिळवणं, त्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक जवळ असणं या गोष्टी आवश्‍यक असतात. म्हणूनच सहसा प्रत्येकानं आपल्या घरात व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे अशा क्रमांकांची यादी ठेवावी असं सुचवलं जातं.

मोबाईलची बॅटरी लो असणं, मोबाईल न लागणं, रिचार्ज नसणं यासारख्या समस्याही उद्‌भवू शकतात. म्हणून ही यादी महत्त्वाची ठरते. हृदय अचानक बंद पडण्याचा धोका असल्याचं तपासण्यांमधून आधी समजल्यास त्यानुसार उपचार करणं शक्‍य होतं आणि प्राण वाचू शकतात. यामध्ये काही औषधं दिली जातात. शिवाय हृदय बंद पडण्याच्या संभाव्य धोक्‍यापासून संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन उपचार सुरू केले जातात.

याखेरीज रुग्णाची स्थिती स्थिरावली की इम्प्लांटेबल कार्डीओवर्हटर डिफायब्रिलेटर म्हणजेच आयसीडीची शिफारसही केली जाऊ शकते. आयसीडी हे बॅटरीवर चालणारं उपकरण गळ्याच्या हाडाजवळ बसवलं जातं. ते हृदयाच्या लयीतील त्रस्तता शोधून काढतं आणि हृदयाला उच्च किंवा कमी ऊर्जेचे धक्के देऊन नियमित कार्य करण्यास प्रोत्साहित करतं.

रक्तवाहिन्या चोंदलेल्या, बंद झालेल्या असतील तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीही केली जाते. हृदयाच्या झडपेत, स्नायूच्या ऊतींमध्ये दोष असेल तर त्यासाठीही विविध उपचार केले जातात. काही लोकांसाठी हृदयरोपण सुचवलं जातं. यातील योग्य उपायांचा दिलासा महत्त्वाचा ठरतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.