मोठ्या सोसायट्यांचा समावेश
पुणे – शहरातील वाढत्या करोना रुग्ण संख्येला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख़्या वाढणाऱ्या शहरातील 42 सोसायटया मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. शहरातील 15 मधील 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ज्या सोसायट्यांमध्ये 20 पेक्षा अधिक व इमारतीत 5 पेक्षा अधिक नवीन बाधित रुग्ण सापडतात अशा सोसायट्यांचा यात समावेश आहे.
शहरात 9 फेब्रुवारीपासून नव्याने करोनाबाधित रुग्णांचा आकडा लक्षणीय वाढला असून दैनंदिन रुग्णसंख्या 700 च्या वर गेली आहे. त्यामुळे शहरात मर्यादित संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच वेळी करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात ज्या भागात करोना रुग्ण वाढत आहेत. असे भाग निश्चित करून ते मायक्रो कंटेन्मेंट झोन करून त्याठिकाणी काही प्रमाणात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, पालिकेकडून शहरात सातत्याने रुग्णवाढ सुरू असलेल्या 42 सोसायट्या निश्चित केल्या असून त्या ठिकाणच्या नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक 7 सोसायट्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहेत.
बाहेरील नागरिकांना आत जाण्यास मनाई
या कंटेन्मेंट झोन करण्यात आलेल्या सोसायटीत बाहेरून जाणाऱ्या नागरिकांना मनाई करण्यात येणार आहे. तसेच या सोसायट्यांच्या बाहेर बॅरेकेडस लावण्यात येणार असून बाधित घरांमधील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात येणार आहे. या शिवाय, सोसायटींच्या नागरिकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना देऊन एकत्र येण्यास मनाई केली जाईल. तसेच या सोसायट्यांचा कचरा पालिकेकडून स्वतंत्रपणे त्याची विल्हेवाट लावली जाईल. तसेच ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजाची मुभा असणार असून त्यांना सुरक्षित वावर ठेवून सोसायटीत ये- जा करता येणार आहे.
शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून शहरात 42 मायक्रो कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.
– रूबल अग्रवाल (अतिरिक्त महापालिका आयुक्त)