गोंधळानंतर आरोग्य विभाग भरती परीक्षा रद्द होणार?

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री पवार यांचे सुतोवाच

पुणे – “आरोग्य विभाग पदभरतीसाठी दोन दिवसांपूर्वी लेखी परीक्षा झाली. यात राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर अनेक गैरप्रकार उघडकीस आले. ही वादग्रस्त ठरलेली पदभरती रद्द होऊ शकते,’ अशी चर्चा उमेदवारांत आहे. तर, दुसऱ्या बाजूला याबद्दलचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत केले आहे.

 

 

आरोग्य विभागात सुमारे 3 हजार पदांच्या सरळसेवा भरतीसाठी दोन वर्षांपूर्वी अर्ज भरून घेण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी सकाळच्या सत्रात 14, तर दुपारच्या सत्रात 40 संवर्गाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये 1 लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, यात औरंगाबाद, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, नगर यांसह अनेक जिल्ह्यांत मोठा गोंधळ झाला. 

 

 

याप्रकरणी काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हेदेखील दाखल केलेले आहेत. या प्रकरणात उमेदवारांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

 

 

पवार म्हणाले, “आरोग्य विभागातील भरतीबाबतची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून माझ्याही कानावर आली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला, पण ते करोनाने आजारी असल्याने सोमवारी (दि.8) सभागृहात येणार आहेत.

 

 

आमदार मेटे यांनी सभागृहात ज्या गोष्टी सांगितल्या, त्यात तथ्य आढळले तर त्यात सरकार हस्तक्षेप करेल. पुरावे समोर आले, तर या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. पण, याचा अंतिम निर्णय सोमवारी घेण्यात येईल.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.