-अमित डोंगरे
बीसीसीआय व श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अट्टहासाने अखेर टी-20 सामन्यांची मालिका अखेर पार पडली. आधी दुखापती व नंतर करोनाचा धोका यांच्या सावटाखाली आणि खेळाडूंचा जीव धोक्यात घालूनही ही मालिका खेळवली गेली. यालाच जागतिक स्तरावरचा निर्लज्जपणा म्हणावा का. दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापती तसेच करोनाग्रस्त खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राखीव खेळाडूंना संघात स्थान देत ही मालिका खेळावी लागली. त्यामुळे त्यातल्या त्यात जो संघ बरा होता तोच जिंकला यालाच वासरात लंगडी गाय शहाणी असे म्हणतात.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली खरेतर खेळाडूंच्या कारकिर्दीला वाढवणारा कर्णधार होता. मात्र, प्रशासक झाल्यावर त्यालाही पैसाच दिसायला लागला व खेळाडूंचा जीव धोक्यात घालायलाही त्याला काहीच वाटले नाही. आता कृणाल पंड्या करोनाबाधित झाल्यामुळे केवळ भारतीय संघावरच नव्हे तर यजमान श्रीलंका संघावरही दडपण होते. त्यांच्या काही खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावरच करोनाने ग्रासले होते, तसेच त्यांच्या मंडळाने दिलेल्या करारामुळेही त्यांच्यात वाद सुरू आहेत, अनेक प्रमुख क्रिकेटपटूंनी या मालिकेतून माघार घेतली होती. म्हणजे मुळातच त्यांच्या संघात नवोदितांचा भरणा असलेला होता.
भारतीय संघातही कृणाल पंड्याला करोनाने घेरले. पाठोपाठ कृष्णप्पा गौतम व यजुवेंद्र चहल यांनाही त्याची बाधा झाली. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंची डोकेदुखी वाढली होती. पण दोन्ही क्रिकेट मंडळांना ही मालिका थांबवावी असे वाटले नाही. भारतीय संघात जे नेट गोलंदाज होते, त्यांनाही अंतिम संघात संधी द्यावी लागली तर श्रीलंका संघातही नवोदितांचा भरणा होता. मात्र, त्यातही श्रीलंकेच्या नवोदितांनी तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.
पहिला सामना वगळता अन्य दोन्ही सामन्यांत भारतीय संघाला फलंदाजीत अपयश आले. पहिल्या सामन्यात 132 धावा करूनही भारतीय संघ जिंकला. मात्र, नंतरच्या दोन्ही सामन्यांत संघाला अपयश आले व त्याचा लाभ श्रीलंकेच्या संघाने उठवला आणि चक्क मालिकाच जिंकली. या दोन्ही सामन्यांत भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे झाले. असा काहीतरी खेळ करण्यापेक्षा हे सामनेच रद्द केले असते तरी चालले असते, पण आले गांगुलीच्या मना तिथे कोणाचे चालेना, असेच चित्र दिसले.
गांगुलीच्या स्वभावात काडीमात्रही बदल झालेला नाही. जसा बेदरकार तो एक खेळाडू व कर्णधार म्हणून होता तसाच तो प्रशासक म्हणूनही आहे. मागे एकदा त्याला भेटल्यावर मुलाखतीसाठी वेळ मागितली होती. तेव्हा त्याने मी वर्तमानपत्र वाचत नाही त्यामुळे मुलाखत देण्याचा प्रश्नच येत नाही, असे उर्मटपणे सांगितले होते.
वर्तमानपत्रे माझ्याबाबतीत काय छापतात ते मला वाचावेसेही वाटत नाही, असेही त्याने म्हटले होते. आता पंड्या करोनाबाधित झाल्यामुळे ही मालिका रद्द करा असा नारा भारतातीलच नाही तर श्रीलंकेतील वर्तमानपत्रांनीही दिला होता, पण त्याकडे पाहण्यासाठी गांगुलीकडेच नव्हे तर कोणाकडेच वेळ नव्हता. एक प्रशासक असूनही त्याला खेळाडूंच्या जिवापेक्षा सामन्यांतून मिळणारा पैसा महत्त्वाचा वाटला हेच खरे.
आता श्रीलंकेतील विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला की पंड्या, चहल व गौतम भारतात, तर पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव इंग्लंडला रवाना होतील. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील प्रमुख भारतीय संघावरही दडपण वाढणार आहे कारण शॉ व यादव इंग्लंडला दाखल झाल्यावर त्यांच्यामुळे करोनाची एन्ट्री कसोटी मालिकेत होऊ नये इतकीच काय ती अपेक्षा. पुढील काळात तरी बीसीसीआय बोध घेईल का, हादेखील एक प्रश्न निर्माण झाला आहे.