टोकियो – भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला दक्षिण कोरियाच्या अन सान हिने केवळ सहा मिनिटांत 6-0 असे पराभूत केले.
रशिया ऑलिम्पिक समितीच्या (आरओसी) केन्सिया पेरोवाचा पराभव करून दीपिकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. कोरियाच्या अन सानने पहिल्या फेरीत थाटात प्रारंभ केला व तीन 10-एस गुण मिळवले, तर दीपिकाने 7-10-10 असे गुण मिळवले.
सानने दुसऱ्या फेरीतही 9-10-7 अशी आघाडी राखली, तर दीपिकाला 10-7-7 गुणच मिळवले. सानने तिसऱ्या फेरीतही वर्चस्व राखत 26 गुण मिळवले, तर दीपिकाला 24 गुण मिळवता आले. सहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत हा सामना संपला.
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दीपिका कुमारीने अफलातून कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश घेत पदकाची आशा दाखवली होती. मात्र, या फेरीत तिला आपला प्रभावच पाडता आला नाही.