मुंबई : राज्यात सध्या कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा गोंधळ सुरु आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने मोडून काढला. तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.
बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाअसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.