आंध्र प्रदेश – दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने तिच्या अभिनयाने सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ओम अंटावा’ या लोकप्रिय गाण्यानंतर तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. समंथाचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक फॅन हे आपल्या आवडत्या कलाकारासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका संमथाच्या चाहत्याने तिचे थेट मंदिरच उभारले आहे. सध्या या आगळ्या -वेगळ्या चाहत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
आंध्र प्रदेशमधील हा समांथाचा जबरा फॅन असून त्याचं नाव तेनाली संदीप असं आहे. त्याने आंध्र प्रदेशमधील बापटलाजवळ आलापडू गावात हे मंदिर उभारले आहे. समांथाच्या सेवाभावी कार्याने प्रभावित होऊन चाहत्याने तिच्या नावावर मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. हे मंदिर 28 एप्रिल अर्थात आज सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. या मंदिरात समांथाची एक मोठी मूर्ती उभारण्यात आली आहे.
प्रत्युषा फाऊंडेशनच्या माध्यमातून तिचे काम पाहून तो अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता बनल्याचे या चाहत्याचे म्हणणे आहे. या प्रकरणी अद्याप समंथा किंवा तिच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण येत्या काही दिवसांत समांथा किंवा तिची टीम या विषयावर नक्कीच आपले मत मांडेल, अशी आशा चाहत्याला आहे.
दरम्यान, दाक्षिणात्य कलाकारांवर तेथील लोकांचे अधिक प्रेम असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. येथील लोक अगदी देवासारखे कलाकारांना मानतात. त्यांची पूजा-अर्चा करतात. सुपरस्टार रजनीकांत यांचे देखील कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामध्ये मंदिर आहे. मात्र येथे मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. याशिवाय बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे देखील कोलकतामधील आनंद नगरीमध्ये मंदिर स्थापन करण्यात आले आहे. येथेही त्यांची पूजा केली जाते.