बारामती – महावितरण अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष माधवराव दंडवते (वय 43 रा. वर्ग दोन बिल्डिंग, फ्लॅट नंबर A6 तिसरा मजला, उर्जा भवन, कर्मचारी वसाहत) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत शहर पोलिसांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की, सहाय्यक अभियंता मनीष माधवराव दंडवते हे दोन दिवसापासून कामावर नव्हते. सकाळी त्यांचा डबेवाला त्यांना डबा देण्यात आला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी डोकावून आत पाहिले असता किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली असता दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी सिल्वर जुबली याठिकाणी पाठवण्यात आले. अभियंता हे सदर ठिकाणी कुटुंबाशिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते. याबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. दंडवते यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही.