बारामती -येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेली बारामती गुन्हे शाखा (क्राईम ब्रॅंच) बरखास्त करण्यात आली आहे. यापुढील काळात या शाखेची पुनर्रचना केली जाणार असून नव्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.
मोहिते यांनी नुकताच बारामतीचा पदभार स्वीकारला. आपल्या आगामी योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, सध्या कार्यरत असलेली क्राईम ब्रॅंच बरखास्त करण्यात आली आहे. एलसीबीची दुसरी टीम बारामती विभागासाठी सुरू करणे अथवा बारामती ब्रॅंचची पुनर्ररचना आगामी काळात केली जाणार आहे. या ब्रॅंचसाठी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल.
बारामती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सहा तालुक्यातील 15 पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र येते. या सर्वच भागात रस्ते सुरक्षेविषयी जनजागृतीसह अन्य उपक्रम हाती घेणार आहे. बारामती शहरात वाहतूक शाखेने अस्ताव्यस्त पार्किंग, वाहन परवाना नसणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.
यात पोलिसांकडून होणाऱ्या दंडाची रक्कम नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने भरावी. रस्ते सुरक्षेविषयी पुरेशी जनजागृती होईलच; परंतु त्याबरोबरच अति वेगाने वाहन चालविणे, ट्रीपल सीट, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, चारचाकी वाहनात सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
जेणेकरून नागरिकांना सवय लागत रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे ही त्या मागची भावना असल्याचे मोहिते यांनी सांगितले. यासोबतच अवैध धंद्यांचा समूळ बिमोड करण्याकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
तीन पोलीस ठाणी मंजुरीच्या प्रतीक्षेत
बारामती विभागात इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर व बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. या पोलीस ठाण्यांना मंजूरी मिळाल्यानंतर सध्याच्या पोलीस ठाण्यांची हद्द कमी होईल. मनुष्यबळही अधिक उपलब्ध होईल. शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मोहिते यांनी सांगितले.