बारामती/डोर्लेवाडी – बारामतीत धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे हे धनगर बांधव आमरण उपोषणाला बसले असून त्यांचा आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांना पाठिंबा आणि त्यांच्या समर्थनार्थ आज बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावांमध्ये धनगर समाजाच्या वतीने भव्य कॅंडल मोर्चा काढण्यात आला.
कॅंडल मोर्चामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत तसेच महिलाही सहभागी झाल्या होत्या. हा कॅंडल मार्च झारगडवाडी गावातून महादेव मंदिरापासून सुरू झाला पिंपळी चौक, गणपती मंदिर, मार्गे मारुती मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौकात दाखल झाला.
यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही.. अशा घोषणांनी महिला आणि युवकांनी झारगडवाडीचा परिसर दणाणून सोडला. यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात जाहीर सभा पार पडली.
यावेळी सोनाली बिचकुले, नेहा बोरकर, संघर्ष मासाळ, राजेंद्र बरकडे, प्रियदर्शनी कोकरे, काळूराम चौधरी यांनी आलेल्या कॅंडल मार्चला संबोधित केले. यावेळी बारामती तालुका पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.