मुंबई – भारताचा हुकमी एक्का व अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी उपांत्य फेरीच्या सामन्यात हिरो ठरला. त्याने न्यूझीलंडचे सात फलंदाज बाद करत विक्रम साकार केला. आता भारतीय संघ रविवारी आॅस्ट्रेलिया संघाशी विजेतेपदाची लढत खेळेल. या लढतीत शमीचे वादळ पुन्हा एकदा घोंगावणार असेच चित्र दिसत आहे.
शमीने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने कमाल केली. ही पहिलीच वेळ आहे की या स्पर्धेत भारतीय फलंदाजी इतकीच चर्चा भारतीय गोलंदाजीचीही होताना दिसत आहे. त्यातही भारतीय गोलंदाजीची चर्चा केवळ फिरकी गोलंदाजीवरच होत होती. आता वेगवान गोलंदाजीची दहशत प्रतिस्पर्धी संघांवर बसवण्यात शमी आणि कंपनी यशस्वी ठरली आहे.
कधी जसप्रीत बूमराह तर कधी महंमद सिराज शमीला साथ देत आहेत व शमी समोरच्या संघाच्या फलंदाजीची वाताहत करताना दिसत आहे. ज्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचे गोलंदाज साफ अपयशी ठरले त्याच खेळपट्टीवर शमीने टीच्चून मारा केला. त्याने न्यूझीलंडच्या भक्कम फलंदाजीला उध्वस्त केले.
भारताचा वेगवान गोलंदाज याने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरूध्द 9.5 षटकात 57 धावा देताना 7 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यदांच्या विश्वचषकात मोहम्मद शम्मी सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने फ्कत 6 सामने खेळताना एकूण 23 विकेट घेत ही कामगिरी केली आहे. यामध्ये आस्ट्रेलियाचा गोलंदाज एडम जम्पा हा 10 सामन्यात 22 विकेटसह दुसऱ्या तर श्रीलंकेचा दिलशान मदुशंका 9 सामन्यात 21 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध तिसरी विकेट घेत विश्वचषकातील 50 बळी पूर्ण केले. यासाठी त्याने केवळ 17 डाव घेतले, जे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचा 19 डावात 50 बळी घेणारा विक्रम मोडला. तसेच शमीच्या नावावर आता भारताकडून विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स आहेत. शमीने वर्ल्ड कपमध्ये एकूण 54 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, या स्पर्धेच्या लीग टप्प्यात अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात एकूण 4 बाद 397 धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाकडून शतके झळकावली होती. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला 48.5 षटकांत सर्वबाद 327 धावांच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फंलदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवलं होते, जे कांगारूंनी 7 विकेट्स गमावून 215 धावा करत अवघ्या 47.2 षटकांत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आणि विक्रमी आठव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. आफ्रिकन संघ पराभूत होऊन पाचव्यांदा विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता पाचवेळा विश्वविजेता कांगारू संघ रविवारी अहमदाबादच्या मैदानावर यजमान आणि दोन वेळचा विश्वविजेता भारताशी भिडणार आहे.