सातारा -शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात होत आहे. उत्सवासाठी महिनाभरापासून गणेश मंडळे, सोसायटीमध्ये उत्साही कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात जल्लोषात मंगळवारी दुपारपर्यंत मानाचे पाच गणपती आणि प्रमुख मंडळांच्या गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जिल्ह्यामध्ये 5285 मंडळांच्या “श्री’च्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
शहरात गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे 19 सप्टेंबरपासून शहर परिसरातील वाहतुकीमध्ये जड वाहनांना प्रतिबंध केला जाणार आहे. शहरामध्ये पोवई नाका, समर्थ मंदिर चौक, राधिका रोड, सातारा शहराच्या एन्ट्री पॉईंटवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बैठक घेऊन जिल्ह्याच्या बंदोबस्ताचा नुकताच आढावा घेतला. जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक तसेच आगमन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले आहे. सातारकरांना दर्जेदार मिठाई तसेच चांगल्या खव्याचे पदार्थ मिळावेत याकरता अन्न व औषध प्रशासनाची पथके गणेशोत्सवात सक्रिय राहणार आहेत. दुकानांची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेतले जाणार आहेत. गणेशाचे आगमन होत असताना अधूनमधून पाऊसही हजेरी लावत आहे.
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मंडप उभारून सजावट पूर्ण करण्याची धांदल सुरू आहे. शहरातील 133 मंडळांना मांडव उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. छतबांधणी, विद्युत दिव्यांच्या माळा, सजावटी इत्यादी साहित्य लावून तयारी पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांचे अहोरात्र काम सुरू आहे.
गणेशाच्या नैवेद्यासाठी चॉकलेट, मावा, स्ट्रॉबेरी, आंबा असे मोदकांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. दीडशे ते दोनशे रुपये पाव किलो दराने मोदक उपलब्ध आहेत. मोती चौक ते शनिवार चौक, खण आळी यादरम्यान नागरिकांनी पूर्वसंध्येला खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. मुख्य वर्दळीचे रस्ते बॅरिगेट्स लावून अडवण्यात आल्याने रस्त्यांवर वाहतुकीचा ताण होता. ठिकठिकाणी वाहतूक जाम झआली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी एकत्रितपणे येथील वाहतुकीचा आणि तयारीचा आढावा घेतला.