सातारा/पाचगणी – महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघनखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तिघांना बोरिवली (मुंबई) पोलिसांनी सापळा रचून जेरबंद करत त्यांच्याकडून दहा लाख रूपये किमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला. तिघांवर मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज लक्ष्मण कारंडे (वय 30, रा. बिरवाडी, ता. महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35, रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) व मंजुर मुस्तफा मानकर (वय 36 रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या तिघांवर भा.द. वि. 9, 39 चा 3, 44, 48 अ, 49 ब, 51 वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथील काही लोक राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघाच्या कातड्याची व त्याच्या वाघनखांची तस्करी करण्यासाठी बिोरवली (पश्चिम) येथील एल. आय.सी मैदानावर येणार आहेत. बोंबे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन शिंदे व सुधीर कुडाळकर यांना दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल यांना ही माहिती दिली. बन्सल यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस पथकाने सापळा रचला. वाघाचे कातडे व नखे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शिताफीने जेरबंद केले. या तीन संशयितांकडून वाघाचे सोलून काढलेले काळया पिवळया रंगाचे पट्टे असलेले 114 सेंटीमीटर लांब व 108 सेंटीमीटर रूंद वाघाचे कातडे त्यासोबत 12 वाघनखे असा साधारण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यातील सपोनि भालचंद्र शिंदे, उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, हवालदार प्रवीण जोपळे, संदीप परीट, प्रशांत हुबळे व गणेश शेरमळे यांनी सापळा रचून संशयितांना जेरबंद केले.
महाबळेश्वर जंगलात वाघ असल्याचे सिद्ध
महाबळेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. परंतु, पट्टेरी वाघ दिसत नाहीत. आपल्या जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, असे वन विभागाचे अधिकारी देखिल सांगतात. परंतु, या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत हे सिध्द होत आहे. यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाच्या शिवारात काही लोकांनी ब्लॅक पॅंथर पाहिला होता. परंतु त्यानंतर तो पॅंथर देखिल पुन्हा दिसला नाही.