वडगाव मावळ – राजकीय भुकंप करुन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीबाबत मतमतांतर असतानाच ‘अजित पवार, तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा’चे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे हे बॅनर लावले आहेत. यामुळे मावळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
आठवडाभरापुर्वी राजकीय भुकंप घडवित, त्यांनी राज्य सरकारमध्ये प्रवेश करत, उपमुख्यमंत्रीपद मिळविले. त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याच्या राजकीय घडामोडीची चांगलीच जाहिरातबाजी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. अजित पवार यांच्या बदललेल्या राजकीय भुमिकेनंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर उपमुख्यंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देणारे अनेक बॅनर तालुक्यात झळकत आहेत.
दरम्यान, दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणारा आरपीआयचा एकही गट नसल्याने राष्ट्रवादीने आरपीआयचा सचिन खरात गट सोबत घेत, निळा झेंडा आपल्या प्रचारात घेतला. त्यामुळे सचिन खरात हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसू लागले. आपले राजकीय स्थान आणखी बळकट करण्यासाठी खरात यांनी मावळ तालुक्यातील उर्से टोलनाक्यासह पिंपरी-चिंचवड शहरातही अजित पवार मुख्यमंत्री व्हा अशा आशयाचे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये देखील हे बॅनर लावण्यात आले आहेत.