#CWC19 : जिगरबाज अफगाणिस्तानविरूद्ध आज बांगलादेशची कसोटी

स्थळ -दी रोझ बाऊल, साउदॅम्पटन
वेळ-दु.3 वाजता

साउदॅम्पटन – भारताला रडकुंडीस आणणाऱ्या जिगरबाज अफगाणिस्तानविरूद्ध लढवय्या बांगलादेशची आज येथे कसोटी ठरणार आहे. हा सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी आव्हान कायम ठेवण्याची संधी बांगलादेशला मिळणार आहे.

अफगाणच्या खेळाडूंनी भारताविरूद्ध दिलेली लढत क्रिकेट पंडितांना चकित करणारी आहे. मोहम्मद नबी याने जवळ जवळ विजय निश्‍चित केला होता. मोहम्मद शमी याच्या एका षटकातील प्रभावी कामगिरीमुळे त्यांना विजयाने हुलकावणी दिली. ड्रेसिंगरूममध्ये त्यांच्या खेळाडूंमधील मतभेद चव्हाट्यावर आले तरी मैदानावर आम्ही एकदिलाने खेळतो याचाच प्रत्यय अफगाणच्या खेळाडूंनी दिला आहे. त्यांच्यासाठी बाद फेरीच्या आशा केव्हांच संपुष्टात आल्या असल्या तरी स्पर्धेबाहेर पड्‌ताना काही संस्मरणीय सामन्यांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत. गुलाबदीन नईबच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ आजच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक झाला आहे.

नईब याने सांगितले, भारताविरूद्ध आम्हाला विजयाच्या उंबरठ्यावरून परतावे लागले आहे. मात्र, या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. बांगलादेशचा संघदेखील बलाढ्य आहे. तरीही आम्ही सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहोत. आमच्या खेळाडूंनी लक्षणीय प्रगती केली आहे. आमच्या कामगिरीची दखल नजिकच्या काळात अन्य संघांना निश्‍चितपणे घ्यावी लागेल.

शकीब अल हसन याने यंदा या स्पर्धेत आतापर्यंत दोन शतके टोलविली आहेत. बांगलादेशच्या फलंदाजीचा तो मोठा आधारस्तंभ आहे. त्याच्यासह पहिल्या फळीतील फलंदाजांनी त्यांना सवसनाटी विजय मिळवून दिला आहे. तथापि गोलंदाजीमध्ये त्यांच्या खेळाडूंची कामगिरी निराशाजनक झाली आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तीनशेपेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. हीच त्यांच्यासाठी मुख्य समस्या आहे. वेगवान व फिरकी गोलंदाजांच्या षटकात आक्रमक खेळ करण्याची आमच्याकडे क्षमता आहे हे अफगाणच्या खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच त्यांना कसे रोखायचे हीच बांगलादेशसाठी कसोटी आहे.

अफगाणिस्तान- गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखील (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीब उल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्‍बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

Leave A Reply

Your email address will not be published.