एलबीटी विवरणपत्रांची माहिती होणार उघड

महापालिकेकडून जाहीर प्रकटन : वारंवार मागणी होत असल्याने निर्णय

पुणे – महापालिकेच्या एलबीटी विभागास आर्थिक वर्षाचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती महापालिकेकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने जाहीर प्रकटन दिलेले असून या निर्णयाबाबत संबंधितांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकतींसाठी 1 महिन्यांची मुदत देण्यात आली असून ही मुदत
30 जून रोजी संपत आहे.

राज्य शासनाने 1 एप्रिल 2013 पासून जकात रद्द करून राज्यात एलबीटीची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानुसार, शासनाने शहरातील व्यावसायिकांना महापालिकेकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेकडून विक्रीकर विभाग तसेच इतर व्यावसायिकांशी संबंधित शासकीय विभागांकडून माहिती संकलीत करून त्यांना नोंदणी देण्यात आली होती. तर ही बाब समोर आल्यानंतर महापालिकेने बजाविलेल्या नोटीसनंतर अनेक व्यावसायिकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यातील बहुतांश व्यावसायिकांनी एलबीटीची अंमलबजावणी सुरू असेपर्यंत महापालिकेस एलबीटी भरताना आवश्‍यक असलेली आर्थिक वर्षांची विवरणपत्र सादर केलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. दरम्यान, एलबीटी सुरू असताना, महापालिकेकडून नोंदणीधारकाचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, त्यांनी भरलेला कर, तसेच त्यांच्या विवरणपत्रांची माहिती असून महापालिकेच्या सभासदांकडून वारंवार या माहितीची मागणी एलबीटी विभागाकडे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून व्यावसायिकांची ही माहिती एलबीटी नियम 52 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्याचा अधिकार महापालिकेस असल्याने ती सभासदांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे माहिती उघड करण्यास अथवा त्याबाबत कोणाच्या हरकती असल्यास अशा व्यक्‍तींनी 30 जूनपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

दरम्यान, महापालिकेने 30 मे रोजी हे निवेदन जाहीर केले असून अद्याप एकही हरकत पालिकेकडे नोंदविण्यात आलेली नसल्याचे एलबीटी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, एकही हरकत न आल्यास ही माहिती सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.