पिंपरी (अँकर स्टोरी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपला आहे. प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. ज्या राजकीय व्यक्ती चिंचवड मतदारसंघातील मतदार नाहीत त्यांना मतदार संघात थांबता येणार नाही, असेही ढोले यांनी म्हटले आहे.
मतदान बंद होण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला आहे. त्यामुळे मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. अशा पदाधिकाऱ्यांना राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण जाहीर करावे लागेल तसेच या कालावधीतील त्यांची ये-जा ही सामान्यपणे त्यांचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण
यापुरतीच मर्यादित राहणार, असल्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध असेल, याबाबत पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश ढोले यांनी दिले आहे.
मतदान संपेपर्यंत जनमत चाचणीस प्रतिबंध
मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करण्यास प्रतिबंध असेल. कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित असतील, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सूचनांप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक विभाग कटिबद्ध आहे, असे ढोले यांनी सांगितले.