प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 20 -सलग दुसऱ्या महिन्यातही शहरात पावसाने रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली असतानाच, खड्ड्यांना जबाबदार कोण म्हणून महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये खड्ड्यांचा चेंडू सुरू आहे. हा चेंडू एकमेकांकडे भिरकावला जात असून, मूळ प्रश्न मात्र जागेवरच राहत आहे.
खड्ड्यांना जबाबदार धरत प्रशासनाने ठेकेदार तसेच महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. शहरभर पाणीपुरवठा विभाग तसेच ड्रेनेज विभागाने खोदाई केली असून, त्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्यानेच खड्डे पडल्याचा खुलासा या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता खड्ड्यांना नेमके जबाबदार कोण, याचे उत्तर मिळण्याची शक्यता मावळली असून, या चेंडू फेकाफेकाचा फटका पुणेकरांना बसत आहे, हे मात्र नक्की.
कार्यकारी अभियंते म्हणतात…
शहरातील रस्त्यांना पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभागच जबाबदार आहे. गेल्या वर्षभरात पाणीपुरवठा विभागाने शहरात जवळपास 400 किलोमीटरची खोदाई केली असून, ड्रेनेज विभागाने 100 किलोमीटरची खोदाई केली आहे. या दोन्ही विभागांचे वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या खोदाईच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांकडून योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. त्याची तपासणीही या विभागाने केली नाही. काम झाले म्हणून आम्हाला कळविले. त्यानंतर या खोदाईच्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करण्यात आले. मात्र पावसाने ठेकेदारांनी केलेल्या दुरुस्तीचे काम खचले असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
पाणीपुरवठा विभाग म्हणतोय…
पथ विभागाने आमच्या खोदाईमुळे केवळ चार ते पाचच रस्त्यांवर खड्डे पडले असल्याचे कळविले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले. तसेच या रस्त्यांची माहितीही संबंधित अभियंत्यांना देण्यात आली असून, त्यावरील प्रती चौरस मीटर खड्ड्यास 5 हजारांचा दंड आकारण्याचे आदेशही दिले असून, सर्वच खड्डे पडलेले रस्ते आमचे नसल्याचा खुलासा पावसकर यांनी केला आहे.
ड्रेनेज विभाग म्हणतोय…
ड्रेनेज विभागाच्या कामानंतर चार ते पाच ठिकाणीच रस्ते खचलेले होते. त्यानंतर तातडीने आम्ही दुरुस्ती केली होती. त्यामुळे शहरभरातील खड्डे ड्रेनेजच्या कामामुळे पडले. असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. महापालिका म्हणून सर्व विभाग एकत्र येऊन नियोजनानुसार काम सुरू असते. अनेक ठिकाणी पथ विभागाने आम्ही काम केल्यानंतर रितसर बिले घेऊन रस्ते दुरुस्त केले आहेत. त्या ठिकाणी खड्डे असतील तर आम्ही जबाबदार ठरू शकत नाही, असे ड्रेनेज विभागाचे प्रमुख संतोष तांदळे यांनी स्पष्ट केले.