मुंबई – राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थेसोबतची आढावा बैठक आज झाली. त्यावेळी च्यांनी हे निर्देश दिले. वैद्यकीय सुविधा निर्मितीसाठी सन 2030 पर्यंतचा आराखडा विभागाने तयार केला आहे. मात्र त्यापूर्वी चांगल्यात चांगल्या सुविधा, अति विशेषोपचार, आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे धोरण असले पाहिजे. यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण आणले आहे.
यानुसार इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने प्राथमिक टप्प्यात नागपूर येथे सुपरस्पेशलिटी, तसेच संभाजीनगर आणि लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना ते काम वेळेत पूर्ण होईल. तसेच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना याठिकाणी लागू होणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.
राज्य शासनाने निवडलेल्या जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम आणि कार्यान्वयन आणि संबंधित रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी आशियाई विकास बॅंकेची आर्थिक आणि तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे. या संस्थांनी राज्य शासनाला पूर्ण सहकार्य करुन अर्थपुरवठा लवकर करावा, जेणेकरुन या महाविद्यालयांच्या उभारणीचे काम येत्या सहा ते सात महिन्यात सुरु होईल, याबाबतचे नियोजन करण्यात यावे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.