पक्षांतरामुळे नव्यांना संधी : बाळासाहेब थोरात

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप ठरले; समविचारी पक्षांना आणखी काही जागा सोडण्यास तयार
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपा-सेनेत प्रवेश केल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मात्र याचा फारसा परिणाम होणार नाही, असा दावा कॉंग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यांनी केला. जुन्या लोकांच्या जाण्यामुळे नवीन उमेदीच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. त्याचा पक्षालाच फायदा होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 125 जागा लढवणार असून मित्र पक्षांना 38 जागा सोडण्यात येतील, अशी माहिती थोरात यांनी आज दिली. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपातील जागावाटपावर अजूनही अंतिम पैसला न झाल्याने युतीमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रणनीतीचा भाग म्हणून कोणता पक्ष कोणती जागा लढवणार याबाबतचा तपशील तूर्तास जाहीर केला जाणार नसला तरी हे ही निश्‍चित झाल्याचे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

2009 साली आघाडी असताना कॉंग्रेसने 170 तर राष्ट्रवादीने 113 जागा लढवल्या होत्या. तर मागच्यावेळी दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. बदललेली राजकीय परिस्थितीत लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचे सूत्र मान्य केले आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपाची माहिती देताना आणखी काही समविचारी पक्ष बरोबर येत असतील तर आम्ही आमच्या आणखी काही जागा सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेला स्थान नाही !
समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या कोट्यातील जागा देण्याची तयारी कॉंग्रेसने ठेवली असली तरी मनसेला मात्र सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला सोबत घेतले जाणार नाही, असे संकेत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी कालच दिले होते. बाळासाहेब थोरात यांना आज याबाबत विचारता मनसेला बरोबर घ्यावे किंवा घेऊ अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)