कलंदर: इंजिनिअर्स…

उत्तम पिंगळे

परवा प्राध्यापक विसरभोळ्यांच्या घरी गेलो तर त्यांनी माझे रुंद आवाजात स्वागत केले व मला म्हणाले, हॅपी इंजिनिअर्स डे. मी त्यांना थॅंक यू म्हणून हात जोडले. मग प्राध्यापक बोलू लागले की, भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरया यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस आपल्या देशात “इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरया यांचा जन्म कर्नाटक राज्यातील मैसूर जिल्ह्यात एका तेलुगू कुटुंबात 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. आर्थिक टंचाईमुळे त्यांना आपल्या शिक्षणात संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्यपूर्व भारतात कृष्णसागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्‍स, मैसूर सैंडल ऑइल अँड सोप फॅक्‍टरी, मैसूर विश्‍वविद्यालय, बॅंक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणेही विश्‍वेश्‍वरया यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भगीरथ म्हणूनही ओळखले जाते. सरांनी मग विश्‍वेश्‍वरया यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला.

स्वातंत्र्यपूर्व भारतातील हा किस्सा आहे. एकदा विश्‍वेश्‍वरया हे इंग्रज अधिकाऱ्यांसोबत ट्रेनमधून प्रवास करत होते. ट्रेनमधील इतर प्रवासी विश्‍वेश्‍वरया यांचा पोशाख आणि दिसण्यावरून खिल्ली उडवत होते. दरम्यान, विश्‍वेश्‍वरया यांनी ट्रेनची साखळी खेचली. ट्रेन तत्काळ थांबली. ट्रेनमधील इतर प्रवासी विश्‍वेश्‍वरया यांना बोलू लागले. ट्रेनमधील पोलीस विश्‍वेश्‍वरया यांना विचारते झाले. साखळी का खेचली. मग विश्‍वेश्‍वरया यांनी सांगितले की, इथून पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर रुळ तुटला आहे. त्यामुळे मी साखळी खेचली.

सुरुवातीला त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्‍वास ठेवला नाही. पुढे जाऊन खरोखरच खात्री करून घेतली असता रुळ तुटलेल्या अवस्थेत आढळला. यावर सर्वांनीच आश्‍चर्याने विचारले की, आपल्याला हे कसे कळले. यावर विश्‍वेश्‍वरया म्हणाले की, मी पेशाने अभियंता आहे. त्यानंतर विश्‍वेश्‍वरया प्रसिद्ध झाले. आजही त्यांच्या कार्याचे जगभर कौतुक केले जाते. ते हाडाचे इंजिनिअर होते.हाडाचा शिक्षक जसा अगदी मनापासून शिकवतो व स्वतःही शिकत असतो तसे ते होते.

आता परिस्थिती खूप बदलली आहे. मी मागेच म्हणालो होतो की, सुमार इंजिनिअर्स खोऱ्याने तयार होत आहेत आणि या सर्वांसाठी नोकऱ्या कुठे आहेत? गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते पण आजच्या इंजिनिअर्सनी आहे ते मेंटेन केले तरी ठीक ही परिस्थिती आहे. इंजिनिअर प्रवेश मार्कांवर व नंतर इंजिनिअरिंगमध्ये चांगले गुण मिळावे म्हणून क्‍लासेस. अशाने नवे काही निर्माण करावे ही गरजच भासत नाही. मग मेंदू काय नवीन शोध लावणार? इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांचे पालकही चांगला पास होऊन चांगली नोकरी लागू दे हीच माफक अपेक्षा बाळगतात.जसे म्हटले जाते की शिवबा किंवा सैनिक तयार व्हावा पण तो शेजारी. तसेच उद्योजक तयार व्हावा पण तोही शेजारीच. आपला मुलगा वा मुलीला चांगली नोकरी मिळावी, मुलगा असेल तर कमावती सून मिळावी व मुलीला चांगला नवरा मिळावा हीच अपेक्षा असते. असे असल्याने नवीन काही करण्याचा ध्यास निघून जात आहे.

अर्थात, यास अपवादही आहे. अनेक संस्था अशा संशोधन कार्यास चालना देतात. तसेच काही तरुण इंजिनिअर्सही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन उद्योगाचा विचार करताना दिसत आहेत. कित्येकांनी चांगल्या नोकरीवर पाणी सोडून व्यवसायात उतरले आहे. देशाच्या प्रगतीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा वाटा मोठा आहे. यामुळे इंजिनिअर्स लोकांची जबाबदारी निश्‍चितच वाढत आहे. इंजिनिअर्सनी नवे शोध व उद्योगधंदे काढून देशाच्या एकूण प्रगतीमध्ये रोजगार निर्मिती व संपत्ती निर्मितीमध्येही हातभार लावणे
गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.