Bahubee of Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले.त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत. दरम्यान, काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार गैरहजर राहिल्यानन्तर आज काटेवाडीत सुप्रिया सुळे भाऊबीज साजरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना आता काटेवाडीत सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या आहेत.याठिकाणी त्या अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी करणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सुप्रिया सुळे या काटेवाडीत दाखल झाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या सोबत मृणाल पवार आणि प्रतिभा पवार या देखील त्यांच्या सोबत काटेवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यासोबत अजित पवार यांचे चुलतभाऊ रणजित पवारदेखील काटेवाडीत आले आहेत. दरम्यान, या सर्वात शरद पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
काल, दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला गोविंदबागेत अजित पवार अनुपस्थित होते.त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या सगळ्या चर्चाना सायंकाळी त्यांनी गोविंद बागेत हजेरी लावत शरद पवार यांच्यासोबत स्नेहभोजन करत पूर्णविराम लगावला. दरम्यान, आज शरद पवार पणदरे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत.