मुंबई : शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणं माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना आता चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणं आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असे ही डॉ. राऊत म्हणाले.
मंत्री डॉ. राऊत म्हणाले की, “आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे.
राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणाऱ्या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.