अमरावती – सध्या सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याचा सुट्टीचा अर्ज चांगलाच व्हायरल होत आहे. विनोद राठोड असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, ते मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात ते अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. राठोड यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बदली सुट्टी लागत असल्यामुळे त्यांनी हा अर्ज केला होता. मात्र, आता त्यांचा हा अर्ज चांगलाच व्हायरल झाला आहे.
राठोड यांना २७ मार्चला साप्ताहिक सुट्टी देण्यात आली होती. मात्र २९ मार्चला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं त्यांनी सुट्टीचा दिवस बदलण्याची मागणी करणारा अर्ज वरिष्ठांना दिला. २९ मार्चला लग्नाचा वाढदिवस असल्यानं २७ मार्चची साप्ताहिक सुट्टी २९ मार्चला बदली करून द्यावी, असं राठोड यांनी अर्जात म्हटलं. मात्र, अर्जात लग्नाचा वाढदिवस नमूद करताना त्यांनी त्यापुढे कंसात ‘पश्चाताप दिन’ असा उल्लेख केला. आणि याच एका शब्दामुळं त्यांचा हा अर्ज चर्चेचा विषय ठरला.
सध्या अमरावती मधील मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात त्यांच्या या अर्जाची बरीच चर्चा रंगली आहे. राठोड यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा उल्लेख थेट “पश्चाताप दिन’ म्हणून केल्याने वरिष्ठ अधिकारी चांगलेच चक्रावून गेले आहेत. सरकारी नोकरी असोवा खाजगी नोकरी कर्मचाऱ्याला सुट्टी स्वतःच्या सुटीसाठी वरिष्ठांकडे अर्ज करावा लागतो.